देवगड तालुक्यातील हे गणपतीचे एक जागृत देवस्थान, येथे गणपतीसह शिवशंकराचे स्वयंभु शिवलींग आहे. देवगड आणी कुणकेश्वर येथून साधारणतः 10 किमी. अंतरावर देवगड मालवण मार्गावर अगदी रस्त्याला लागुनच पोखरबांव हे ठिकाण आहे. अगदी सहज गाडीतून जातानाही या गणपतीचे दर्शन होते. आणि नकळत प्रत्येकाचे हात येथे जुळले जातात. मुळ दाभोळे गावात असलेले हे ठिकाण. अतीशय निसर्गसंपन्न आणि शांत अशा वातावरणात आहे. सभोवताली गर्द आमराई, डोँगरातुन वाहत आलेला बारमाही पाण्याचा प्रवाह आणि गणपती आणि शिवशंभूच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला एक वेगळेच सौँदर्य प्राप्त झाले आहे. तसेच शंकराची पाण्यामध्ये ध्यानस्थ बसलेली मुर्ती, हनुमंताचे शिल्प अशी बरीच शिल्पे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
'बांव' म्हणजे विहीर येथून वाहत असलेल्या पाण्याच्या खणन कार्यामुळे येथे एक खोलगट खड्डा तयार झाला वरुन पाहीले असता एखाद्या पोखरलेल्या विहीरीप्रमाणे या भाग दिसतो म्हणून याठिकाणाला 'पोखरबांव' हे नाव पडले. याविहीरीत विविध जातीचे मासे ही आढळतात. तसेच मनात एखादी ईच्छा धरुन या विहीरीत पैसे टाकले असता ती ईच्छा पुर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.पोखरबांव हे एक पर्यटन ठिकाण म्हणून नावारुपास येत असून अनेक पर्यटक तसेच शैक्षणीक सहली या स्थळाला भेट देतात. महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. तसेच गणेश जयंती, अंगारकी संकष्टी, गणेश चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते.