देवगड पासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर इळये गाव वसले आहे. देवगडहून कुणकेश्वर ला जाणारा सागरी महामार्ग हा इळये गावातून जातो. या गावचा आकार साधारणतः विळ्यासारखा भासत असल्याने या गावाला प्राचीन काळी 'विळये' असे म्हणत त्यानंतर विळयेचा अपभ्रंश होऊन इळये हे नाव प्रचलीत झाले. येथील जागृत देवस्थान श्री देवी महालक्ष्मी आणि श्री देव लिँगेश्वर यांच्यामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. या गावच्या मुख्य रस्त्याला लागूनच महालक्ष्मीचे देखणे मंदीर आहे. या मंदिराचे नव्यानेच नुतनीकरण करण्यात आले असून देवी महालक्ष्मीच्या नवीन मुर्तीची काही वर्षाँपुर्वीच प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कुणकेश्वरला जाणारे पर्यटक आवर्जुन या देवीचे दर्शन घेतात. या मंदिरापासून रस्त्याने कुणकेश्वरच्या दिशेने काही अंतर चालत गेल्यास डाव्या बाजुला एक मार्ग लागतो येथून लिंगेश्वर मंदिराकडे जाता येते. लिँगेश्वराचे मंदिर पुरातन असुन आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील मळ्यामध्ये कलिँगडाची शेती केली जाते. इळये गावची कलिँगड प्रसिद्ध आहेत. मुख्य रस्त्याने अजून थोडे चालल्यास डाव्या अंगालाच एक गणेशाचे स्थान आहे. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड जांभ्या कातळात साधारणतः 3 इंच व्यासाचा आणि 1 ते दिड फुट खोलीच्या बोगद्यामध्ये अगदी कातळात गणेशाची प्रतिमा प्रकटली आहे. बारकाईने निरीक्षण केल्यावर या गणपतीचे दर्शन होते. महालक्ष्मी मंदिराकडून देवगडच्या दिशेने गेल्यास असरोंडी येथील घाटीवर हनुमंताची कातळात कोरलेली मुर्ती आपणास दर्शन देत उभी असल्याचे दिसते. गाडीतून जाताना नकळत प्रत्येकाचे हात येथे जोडले जातात. पुर्वी येथे हनुमंताच्या समोरुन गाड्यांचा मार्ग होता. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हा मार्ग मागील बाजुने वळविण्यात आला आहे. हनुमंताचे स्थान असल्याने या घाटीला हनुमंताची घाटी असे नाव पडले आहे. अशाप्रकारे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले इळये गाव देवगड तालुक्यात आपले वेगळेपण टिकवून आहे.