देवगड-तारामुंबरीच्या खवळे महागणपतीची लिम्का बुकमध्ये नोंद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख तांडेल असलेला शिव तांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण-मालाडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करीत असत. याच मंदिरातील गणपतीची मूर्ती त्यांच्या स्वप्नात आली आणि ‘माझा मोठा उत्सव कर, तुला पुत्ररत्न होईल’ असा दृष्टांत दिला. देवगड-तारामुंबरी येथील खवळे महागणपतीची जगातील वैशिष्टय़पूर्ण गणपती म्हणून लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. या गणपतीला ३०९ वर्षांची परंपरा आहे. या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. क्षेत्रातील दीड टन साधी माती लाकडी घाण्याने मळून त्याचे गोळे केले जातात. महागणपतीची मूर्ती श्रावण नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून बनविण्यास प्रारंभ होतो. ही मूर्ती खवळे घराण्यातील पुरुष बनवितात. भाऊ खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत खवळे व चंद्रकांत खवळे हे बंधू ही मूर्ती साच्याशिवाय बनविली जाते. ही मूर्ती बैठी पावणेसहा फूट उंचीची असते. गणेश चतुर्थीला या महागणपतीच्या संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजा केली जाते. फक्त डोळे रंगविले जातात व विधिवत पूजा केली जाते.
शिव तांडेलने छत्रपतींच्या सदराला शोभेल असा १७०१ मध्ये उत्सव चालू केला, तोच हा उत्सव खवळे महागणपतीच्या नावे प्रसिद्ध आहे. कालांतराने त्यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव गणोजी असे ठेवले. १७५६ साली गणोजी विजयदुर्ग किल्ल्यावर इंग्रजांशी लढताना पकडले गेले. त्यांना शिक्षा झाली. आजही गणोजी सरदाराची समाधी तारामुंबरी येथील खवळे घराण्याच्या क्षेत्रात आहे. गणोजी यांची नववी-दहावी पिढी महागणपतीचा उत्सव साजरा करीत आहे. अनेक वैशिष्टय़ांमुळे या गणपतीची दखल लिम्का बुकने घेतली.