साळशी गांव




गर्द वनराईने नटलेले जिथे निसर्गाने आपली किमया दाखविण्यात थोडीही कसर शिल्लक ठेवलेली नाही असे आणि धार्मीक महत्व प्राप्त असलेले देवगड तालुक्यातील साळशी हे गाव! धार्मीक महत्व यासाठी की चौय्राऐँशी खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखला जाणारा श्री देव सिद्धेश्वर आणि देवी पावणाई या दैवतांचे वास्तव्य या गावात आहे. देवगड - निपाणी महामार्गावरील शिरगाव बाजारपेठेपासून 6 कि.मी. अंतरावर साळशी हे गाव आहे. निसर्गाच्या छायेत वसलेले तसेच थंड वातावरण यामुळे गावात गेल्यावर प्रसन्न वाटते. गावात श्री देव सिद्धेश्वर मंदीर आणि देवी पावणाई मंदीर ही दोन मुख्य मंदीरे असून सिद्धेश्वर मंदीराचे बांधकाम अलीकडच्या काळातील आहे सुबक व देखणे असे हे मंदीर असून मंदीराचा कळस उंच आहे. मंदीरासमोर एक चौथरा आहे यावर श्री गणेशाची पाषाणरुपी मुर्ती मंदीराच्या दिशेने तोंड करुन स्थानापन्न आहे. त्याच्या डाव्या अंगाला दिपमाळ व दिपमाळेच्या समोर मोठे तुळशी वृंदावन दिसते. सिद्धेश्वर मंदीराच्या डाव्या बाजुला देवी पावणाईचे पुरातन मंदीर आहे. या मंदीराचे प्रवेशद्वार प्रशस्त असून विशाल सभामंडप तसेच लाकडामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम आणि कोरीव खांब ही या मंदीराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मंदीरात देवीची पालखी आणि गाभाय्राच्या बाहेर देवतांचे तरंग (खांबखाठ्या) ठेवलेले आहेत. दोन्ही मंदीरांना स्वतंत्र आवार असून येथील धार्मीक वातावरणात येणारा भाविक आपसूकच या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतो.