मुणगे गाव



देवगड आणि मालवण या दोन तालुक्यांच्या सीमेवर मुणगे गाव वसले आहे. देवगडपासून 30 किमी. आणि कुणकेश्वरपासून 16 किमी. अंतरावर मुणगे गाव आहे. कोँकणातील सर्व वैशिष्टे मुणगे गावात अगदी भरभरुन पाहता येतात. म्हणजे हिरवेगार डोंगर, डोंगरात लपलेली कौलारु घरे, समुद्र किनारा, रानडुक्कर वाघ यांसारखे जंगली पशु, आंबे, रतांबे (कोकम), फणस, काजु, नारळ, पोफळीच्या बागा, करवंदांच्या झाळी, आणि अशा निसर्गरम्य परिसरात दिमाखात उभे असलेले ग्रामदेवतेचे मंदीर अशी एकंदरीत कोँकणाला साजेशी सर्व वैशिष्ट्ये या गावात आहेत. प्राचीन काळी या गावात ऋषीमुनीचे वास्तव्य होते म्हणून या गावाला मुनीग्राम असे म्हटले जायचे. कालांतराने मुनीग्रामचे अपभ्रंश होऊन मुणगे असे नाव रुढ झाले. या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे. देवी भगवतीचा वरदहस्त या गावावर असल्याने हे गाव प्रसिद्धीस आले आहे. अगदी सागरी महामार्गाला लागूनच देवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे. मंदीरातील बहुतांशी बांधकाम हे लाकडी असून अतीशय सुबक कोरीवकाम या लाकडी बांधकामावर केलेले आहे. मंदीराचा एकूण परिसरच शांत आणि रमणीय असा आहे. मंदीराच्या मागच्या बाजुला एक बारमाही पाण्याचा झरा असून. येथे हात-पाय धुवूनच देवीच्या दर्शनाला जावे लागते. या झय्रापासून थोड्या अंतरावर महापुरुषाचे जागृत स्थान आहे. मंदीर परिसरात देवी अनभवनी, देव गांगो, देव गायगरब ई. देवतांची स्थाने आहेत. देवीचे वार्षीक उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात यामध्ये पौष पौर्णिमेला देवीचा 5 दिवस जत्रोत्सव असतो. यावेळी देवीचे गाभाय्रात जाऊन दर्शन घेता येते ईतर दिवशी फक्त पुजारीच गाभाय्रात जाऊ शकतात. जत्रोत्सवा व्यतिरीक्त होळी, देवीची डाळपस्वारी, देवी माहेरी जाणे ई. वार्षीके गावात होत असतात.तसेच आई भगवती ही महाशिवरात्रीला कुणकेश्वरच्या भेटीस ही येते. मुणगे गाव हे क्षेत्रफळाने तसे मोठे आहे. गावात 12 वाड्या असून त्या विस्तारलेल्या आहेत. काही वाड्या समुद्र किनारी असून काही डोँगराच्या कुशीत दुर्गम भागात तर काही माळरानावर कातळावर अशाप्रकारे गावचा विस्तार झालेला आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती, व आंबा बागायती आहे तसेच समुद्र किनारा जवळ असलेल्या वाड्यांमध्ये पारंपारिक मासेमारी व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. मुणगे गावात पर्यटनदृष्ट्या समृद्ध असे समुद्रकिनारे आहेत भगवतीच्या देवस्थानामुळे धार्मीक पर्यटनास ही येथे वाव आहे. गावात पर्यटकांची संख्या वाढती असून. पर्यटकांच्या सोयीसाठी मंदीरानजीक भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे नैसर्गिक विविधतेने नटलेले, तसेच देवी भगवतीच्या वास्तव्याने पावन झालेले मुणगे गाव हे देवगड तालुक्याचे भूषण आहे.