देवगड तालुक्यातील निसर्ग संपन्न गावांपैकी एक गाव म्हणजे तांबळडेग होय. देवगड पासुन सुमारे 30 कि.मी. तर कुणकेश्वर पासुन 15 कि.मी. आणि मिठबांव येथुन 5 कि.मी. अंतरावर तांबळडेग गाव आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन रुपेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मीती केली असावी. समुद्र किनाय्राला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता गजबा देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. भौगोलिक महत्त्व पाहता ग्रँनाईट या खनिजाच्या साठ्यांनी संपन्न असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अतीशय अनुकूल आहे. गावचा प्रमुख व्यवसाय मासेमारी असून, तांबळडेगची खास ओळख म्हणजे. अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे प्रजननासाठी या किनाय्राला पसंती दर्शवितात. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडली जातात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना फारशी याची माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा याठिकाणी आवर्जुन येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चीत भेट द्यावी.