देवगड बंदर
निपाणी-राधानगरी-फोंडाघाट-नांदगाव-देवगड म्हणून जो राज्यमार्ग ओळखला जातो, तो देवगडला ज्या ठिकाणी संपतो तेच देवगड बंदर होय. देवगड एस.टी. स्थानकापासून 2 कि. मी. अंतरावर देवगड बंदर आहे. स्थानकावरुन बंदराकडे जाताना देवगड शहरातूनच जावे लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी जेटी तर पश्चिमेला देवगड समुद्र किनारा लागतो. येथे उत्तम रस्ता असल्याने पायीच फिरणे उत्तम. सुमारे 1 कि.मी. लांबीच्या खाडीच्या किना-यावरुन रस्ता गेला आहे. वाटेत हिरवीगार झाडी, वेडी वाकडी वळणे, मच्छिमारी नौकांची ये- जा, खाडीतील लहान लहान लाटा, नौकांची गर्दी आणि मच्छिमारांची वर्दळ हे दृश्य अतिशय सुरेख आहे.
देवगड बंदराचे उद्घाटन दि. 3 मे 1958 रोजी झाले. पूर्वी या बंदराला वैभवशाली दिवस होते. सागरी मार्गाने कोकणचे प्रवेशव्दारच म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी गुजरात, मुंबई, गोवा, मंगलोरहून येथे मालवाहतुक चाले. धान्य, पेट्रोल, रॉकेल,मसाल्याचे पदार्थ, लाकूड कौले, मीठ इ. माल घेऊन शिडाची तसेच यांत्रिक मोठमोठी जहाजे येत असत. तसेच पणजी, मुंबई अशी देवगड मार्गे प्रवासी वहातुकही चाले. रत्नागिरी ते सावंतवाडी आणि देवगड ते कोल्हापूर-सांगलीसाठी हेच बंदर जवळचे आणि सुरक्षित होते. ही वाहतुक म्हणजे कोकण विकासाच्या नाडयाच होत्या. परंतु आता वहातुकीची अन्य साधने उपलबध्द झाल्यामुळे तसेच प्रवाशी वहातुक तोटयात आल्यामुळे या बंदारातून होणारी सर्व प्रकारची वहातुक सध्या बंद आहे. असे असलेतरी देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे बंदर नैसर्गिकरित्याच मच्छिमारीसाठी अतिशय सुरक्षित असल्याने मच्छिमारी व्यवसायासाठी या बंदराचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो. वेळप्रसंगी शिडाच्या तसेच यांत्रिक अनेक छोटया- मोठया नौका, होडया, पाती, ट्रालर,गलबते या बंदराचा आश्रय घेतात. मच्छी हंगामात देवगड समुद्रात मिळणा-या मच्छीची लिलाव पध्दतीने खरेदी-विक्री येथेच केली जाते. यामुळे या व्यावसायातील हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मच्छिमारी व्यवसायासंबंधित येथे चार सहकारी संस्था आहेत.
सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार बंदर म्हणून आनंदवाडी जेटीङ नावाने देवगड बंदर विकसित होत असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.
देवगड समुद्रात मुबलक मासळी
देवगड बंदरातील मच्छीमारी व्यवसाय आता जोमाने सुरू झाला असून, स्थानिक मच्छीमारांना मुबलक मासळी मिळू लागली आहे. मात्र मासळी खरेदी करणारे परजिल्ह्यातील व्यापारी अद्याप उतरले नसल्याने मासळीला चांगला भाव मिळत नसल्याची मच्छीमारांची खंत आहे.
स्थानिक खवय्यांतून मात्र सध्या स्वस्तात मासळी मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पावसाळय़ानंतर ट्रॉलर समुद्रात जाऊ लागले आहेत. सध्या मासळीचा हंगाम चांगला असून, निर्यातक्षम मासळी मिळू लागली आहे.
खराब हवामान व वादळी पाऊस यामुळे ट्रॉलर जागेवरच उभे असायचे. अधूनमधून मासळीसाठी समुद्रात जाऊनही फारशी मासळी हाताला लागली नाही. मात्र गेले काही दिवस निरभ्र आकाश व चांगले हवामान असल्याने मच्छीमारांनी आपले ट्रॉलर्स समुद्रात नेण्यास सुरुवात केली आहे.
निर्यातक्षम मासळीमध्ये पापलेट, सुरमई, हलवा, सरंगा, मोरी ही मासळी सापडू लागली आहे. भविष्यात अशा प्रकारे चित्र राहिल्यास मासळीचा यंदाचा व्यवसाय चांगला होईल, असे चित्र आहे. मासळी मिळू लागल्याने बांगडा, सौंदाळे, पेडवे, कापी यांसारखी दुय्यम दर्जाची मासळी बाजारात माफक किमतीत येऊ लागली आहे. यामुळे खवय्यांची चंगळ होऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment