देवगड तालुका हा भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. देवगड हे समुद्रकिनारी वसलेले सुंदर शहर आहे
देवगड स्पॉट्स (देवगड मधील पर्यटन स्थळे)
२७ सप्टेंबर हा पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यामधील अत्यंत गाजलेले, सुंदर, मनमोहक असे पर्यटन स्थळे, तुमच्या समोर आणण्याचा किंवा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून या प्रोफाईल ला "Devgad Spots" (देवगड स्पॉट्स) म्हणजेच देवगड मधील पर्यटन स्थळे हे नाव दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील पर्यटन स्थळे (स्पॉट्स) अत्यंत सुंदर आणि देखणे, जणू पाहतच राहावे असे वाटते. सुंदर आंब्यांच्या बागा, नारळाच्या बागा, काजूच्या बागा, सुपारीच्या बागा तसेच चिकू, पेरू, अननस, फणस अश्या बऱ्याच बागा पहावयास मिळतात. पावसात छान निसर्गाचे देखावे पहावयास मिळतात. येथे पर्यटकांसाठी फिरावयास खूप सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. या ठिकाणांची विस्थार माहितीसाठी आमची वेबसाईट पाहू शकता.
महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तंबू निवास, पर्यटन निवास उभारलेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोठेही राहण्या-जेवण्याची अडचण भासणार नाही.
देवगड मधील माणसे खूप प्रेमळ आहेत. शेतात राब राब राबून धान्य पिकवतात. तांदूळ, नाचणी, भुईमुग, मका, बाजरी, उडीद, तूर, इत्यादींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. इकडे जास्त करून मालवणी भाषा बोलली जाते तसेच शुद्ध मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेचा पण वापर केला जातो.
हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्राच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. दोन टेकडयांमधील देवगड समुद्रकिना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे.
देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार बंदर म्हणून आनंदवाडी जेटीड नावाने देवगड बंदर विकसित होत असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.
देवगड किना-यावरील पवनचक्क्या सध्या बहुतेक सगळया बंद अवस्थेत. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने या पवनचक्क्या उभारल्या आहेत.
देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात. अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत. मातीचा मागमूसही नसलेल्या ठिकाणी कातळामध्ये खड्डे काढून त्यात बाहेरून माती आणून रोपे लावली असून प्रसंगी माणसाकडून खांद्यावरून मिळेल तेथून पाणी आणून ही झाडे जतन केली आहेत. इथल्या शेतक-याने विज्ञानाची Cस धरून आंब्यावर वेगवेगळे प्रयोग केले असून त्यामुळे उत्पन्न आणि दर्जा वाढवण्यास मदत झाली आहे.
मुंबई-देवगड अंतर ४८० किलोमीटर. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव वरून देवगडला जाता येते. अंतर ५०-५५ किलोमीटर.
जवळील रेल्वे स्थानक - कणकवली. कणकवली स्थानकाहून देवगड हे अंतर ५५ किलोमीटर आहे.